भारत जोडो पदयात्रा संबंधित सोशल मिडियावर भडकावू भाषणे, पोस्ट प्रसारित केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्ह्यात दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांचा भारत जोडो पदयात्रा निमित्त हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम असून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमास इतर राजकीय पक्षाचे वर्गीकृत, अवर्गीकृत व्यक्ती हजर राहण्याची शक्यता असून खासदार राहूल गांधी यांचे नांदेड येथून हिवरा पाटी मार्गे हिंगोली जिल्ह्यात आगमन होणार आहे. पुढे वारंगा फाटा-बाळापूर-कळमनुरी-हिंगोली-कनेरगाव (नाका) मार्गे वाशिम जिल्ह्यात जाणार आहेत.
या भारत जोडो पदयात्रा संबंधाने हिंगोली ते वाशिम दरम्यान मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. या पदयात्रे संदर्भात भडकावू भाषणाची व्हिडिओ क्लीप, घोषणा, घोषवाक्य किंवा छायाचित्रे, व्यंगचित्रे इत्यादी सोशल मिडियावर प्रसारित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भारत जोडा पदयात्रेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून भडकावू भाषणाची व्हिडिओ क्लीप, घोषणा, घोषवाक्य किंवा छायाचित्रे, व्यंगचित्रे इत्यादी सोशल मिडियावर प्रसारित होण्यास प्रतिबंध होण्यासाठी आदेश देण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी कळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने भारत जोडो पदयात्रा संबंधाने सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारच्या पोष्ट, भडकावू भाषणे, आक्षेपार्ह इत्यादी बाबी प्रसारित करण्यास भारतीय दंड संहिता 1860 कलम 553 (अ), 116, 505 नुसार दंडनीय अपराध केला आहे, असे गृहीत धरुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
*****
Page No.02
भारत जोडो पदयात्रा निमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती
हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 07 : राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत जिल्ह्यातून जाणार आहे. या भारत जोडो पदयात्रा कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय काँग्रेंस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांना सुरक्षेच्या दृष्टीने झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे. भारत जोडो पदयात्रानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात आला आहे. परंतु या काळात राजकीय कारणावरुन किंवा इतर शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते.
त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 11 नोव्हेंबर, 2022 ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 06 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 06 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे.
हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 11 नोव्हेंबर, 2022 ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.
*****

Comments
Post a Comment